मी, एक वाचक – भाग १

नमस्कार मंडळी,

मातृभाषा, मराठीत, मी लिहित असलेला हा पहिलाच लेख. अनेक वर्षात मराठी लेखनाशी संपर्क तुटल्यामुळे काही शुद्धलेखनाच्या चुका होण्याची दाट शक्यता आहे. तरी सुजाण वाचकांनी अपराध पोटात न घालता यथोचित अगदी प्रसंगी कडक टीका करावी! 😉

विलेपार्ले या ‘राज्याविषयी’ मला खूप आपुलकी आहे; खूप म्हणजे पु.लं.पेक्षाही काकणभर जास्तच! पण ‘विलेपार्ले’ हा एक स्वतंत्र विषय असल्यामुळे, इथे फक्त, विलेपार्ल्यातील ग्रंथालयांचा उल्लेख मी करणार आहे. टिळक मंदीर, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि जीवन विकास केंद्र या ग्रंथालयांचा मी प्रदीर्घ काळ सदस्य होतो. सध्या माझी आई, महिलासंघ ग्रंथसंग्रहालयाची सदस्या आहे, त्यामुळे मराठीशी नाळ पूर्णपणे तुटली नाही आहे. यात वेळोवेळी, माझ्या पालकांनी, मला मन:पूत खरेदी करू दिलेल्या पुस्तकांची भरच पडली आहे. मी अगदी ‘असमाधानी’ वाचक आहे. ‘हविषाकृष्णवर्तमेव उपभोगे न शम्यते’ अर्थात ‘अग्निमधे कितीही आहुती दिली तरी तो शांत न होता वाढतच जातो’ या न्यायाने माझ्यातला वाचक जगतो.

माझ्या वाचक जीवनाची सुरुवात ‘कोल्होबाने खाल्ला अकलेचा कांदा’ वगैरे सारख्या मोठा टाईप असलेल्या मराठी पुस्तकांनी झाली. आज आठवायचा प्रयत्न केला तर या कोणत्याही पुस्तकांच्या लेखकांची नावं मला आठवत नाहीत. त्या काळी साठ पैसे ते दोन रुपये किमतीला मिळणाऱ्या या पुस्तकांतली दोन चार पुस्तकंच माझ्याकडे उरली आहेत. पण या पुस्तकांनी मला स्वप्नांचे पंख दिले; माझ्यातली कल्पकता जागवली; उत्कन्ठेशी माझा परिचय करून दिला; एका अशा विश्वात मला नेऊन सोडलं की जिथे मी कधीच एकटा पडत नाही. आधाशासारखी ही पुस्तकं मी वाचायचो. या पुस्तकांच्या मुखपृष्ठांनी, माझ्या मनात, राक्षस, पऱ्या, राजपुत्र, राजकन्या आणि अशा काही जादुई कल्पनांना मूर्त स्वरूप दिलं आणि ते असं काही मनावर ठसून आहे की आज जगभरातील उत्तमोत्तम कार्टून्स (‘व्यंगचित्र’ हा मराठी शब्द अपुरा असल्यामुळे!) बघूनही ते पुसलं जात नाही.

नंतर माझ्या पुस्तकविश्वात एक प्रभंजन आलं, ‘किशोर’ नावाचं. ज्येष्ठ साहित्यिक वि.वा. शिरवाडकरांचे धाकटे बंधू वसंत शिरवाडकर यांनी संपादित केलेलं एक अलौकिक मासिक! प्रत्येक कर्तुत्व आणि सम्यक यश आर्थिक मापदंडाने मोजण्याचा हा जो कालखंड आहे त्यात शिरवाडकरांसारखी लोकं निर्माण होतचं नाहीत. आजच्या आणि येणाऱ्या पिढ्यांची ही न भरून निघणारी हानी आहे. ‘किशोर’ मासिकाने जगभरातील उत्तमोत्तम साहित्य मुलांना उपलब्ध करून दिलं. त्यात शिरवाडकर स्वत: एक सदर लिहायचे, ‘असे हे विलक्षण जग’ नावाचे. त्यात ह्या विचित्र विश्वाशी माझा पहिला परिचय झाला. आजच्या मुलांना आवडणारे डायनोसोर मला तिथेच पहिल्यांदा भेटले. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की शिरवाडकर स्वत: ‘दिनासूर’ या शब्दाचे जनक आहेत. याच सुमारास मला फा. फे. भेटला, चवथीत असताना. सर्वश्रेष्ठ बालसाहित्यिक भा. रा. भागवतांचा हा मानसपुत्र. त्याच्या बावीस भागांमधून माझा परिचय ‘साहस’ या प्रकाराशी झाला. माझ्या वयाच्या विशीत जेव्हा मी पहिल्यांदा फुरसुंगिला गेलो तेव्हा भाई फेणे इथेच कुठेतरी रहात असतील तर बनेश उर्फ फास्टर फेणेला भेटून येऊ या का असा विचार मनात येऊन गेला. जसा थोडा मोठा झालो तसा भ. रां.चा दुसरा मानसपुत्र नंदू नवाथे भेटून आनंद देऊन गेला. कालातीत अशा जुल्स व्हर्न या लेखकाशी गाठ घालून देणारे भा. रा.च! कॅप्टन निमो, रोव्हर, जगाची फेरी ऐंशी दिवसात पूर्ण करणारा फिलिअस फॉग, बेन झूफ, हेक्टर सर्वादक आणि अशी कित्येक मन्डळी हॉलीवूडच्या कित्येक वर्ष आधी मला भेटली याचा मला कुठेतरी अभिमान वाटतो. या पुस्तकांच्या मदतीने मी पृथ्वीच्या पोटात, समुद्राच्या तळाशी आणि धुमकेतूच्या शेपटावर बसून फिरून आलो. पुढच्या अनेक विश्वरूप दर्शनांसाठी मला दिव्यदृष्टी दिली ती या पुस्तकमित्रांनीच! नाथमाधवांची ‘वीरधवल’ आणि गो. ना. दातारांची ‘इंद्रभुवनगुहा’ मला मोहवून गेली ती Harry Potter आणि Lord of the Rings आयुष्यात यायच्या अनेको वर्षे आधी!

अजरामर अशा किशोर कालखंडानंतर मी आणि माझ्या वाचनाने कुमारवयात पदार्पण केलं. इथे मी वाचनातला पौष्टिक आहारही घेतला आणि टपरीवरचे पदार्थही चाखले. सुहास शिरवळकर हा माझ्या त्या युगातला माझा देव. दारा बुलंद, मंदार पटवर्धन, अमर विश्वास आणि फिरोज ईराणी ह्या नावांनी मनात आयुष्यभरासाठी घर केलं. माझ्यातल्या उमलत्या तरुणाला आत्मविश्वास दिला तो या लोकांनी. माझ्या वाचक जीवनातला हा भाग सगळ्यात रोमहर्षक होता. या भागात मी पुस्तकं वाचली नाहीत तर माझ्या आईच्या भाषेत सांगायचं झालं तर ‘खाल्ली’. शिकारकथांनी प्रेरित होऊन मी जिम कॉर्बेटचा मित्र झालो; वन्य जीवांच्या भीतीयुक्त आकर्षणातून, हातात साधा चाबूकही न घेता दहा पंधरा वाघ सिंहांचे खेळ घेणाऱ्या, दामू धोत्रे बरोबर पिंजऱ्यात जाउन आलो; पु.ल. या अवलियाच्या भक्तगणांमध्ये आजीवन हजेरी लागली ती याच वयात, कविता पाठ्यपुस्तकाबाहेरही असतात आणि बाहेरील जास्त चांगल्या असतात हा शोधही याच वयातला, व. पु. काळे जरा डोक्यावरून गेले आणि उंची वाढल्यानंतरच डोक्यात शिरले, ह. ना. आपटे वाचायचे साहस आता पुन्हा झेपेल का नाही माहित नाही पण तेव्हा झेपवले; अश्लील साहित्याने कानशीलं तापवली तो काळही हाच होता; वाचनाने जणू माझ्यावर मोहिनीमंत्र घातला होता.

जसं जसं वय वाढत गेलं तशा जाणीवेच्या कक्षा रुंदावत गेल्या. वाचनाची आवड लक्षात घेऊन पुस्तकं भेट देणारे आणि सुचवणारे भेटायला लागले. जास्त जाणीवपूर्वक वाचायला लागलो. मला आठवतं आहे की मी ठरवून एक एक लेखक संपवायचो. पार्ल्याच्या ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या’ ग्रंथपालांचा मी आजीवन ऋणी आहे. व.पु., पु.ल., सु.शि. होतेच पण त्यांच्या जोडीला गो.नी. दांडेकरांनी ओघवत्या संवादात्मक शैलीशी गाठ घालून दिली; श्री. ना. पेंडसेंचे ‘तुंबाडचे खोत’ दोन हजार शंभर पानं, चारशे वर्षे आणि मनाचा एक कोपरा भरून उरले, ‘रथचक्र’, ‘गारंबीचा बापू’ हडबडवून टाकून गेले; जयवंत दळवींची, मनाचे काळे कोपरे प्रकाशून टाकणारी कथा, आक्रसवून गेली; जी. ए. कुलकर्णी आजपातूर कळलेच नाहीत; अरविंद गोखलेंच्या कथाही बऱ्या वाटल्या पण मनात घुसल्या नाहीत, यशवंत रांजणकर, द.पां. खांबेटे या लोकांनी जगभरातल्या अनवट न उकलेल्या रहस्यांशी भेट घडवली, कुमुदिनी रांगणेकरांनी Romantic Comedy दिली, रत्नाकर मतकरी आणि नारायण धारपांनी खूप घाबरवलं; जयंत नारळीकर, निरंजन घाटे मराठीत लिहिते झाले नसते तर Science Fiction म्हणजे काय रे भाऊ अशीच अवस्था राहिली असती; वीणा गवाणकरांना पदपथावर J. W. Carver चं चरित्र मिळालं नसतं तर मराठी भाषेत उत्तम चरित्र लिहिणार्यांची यादी अपूर्ण राहिली असती; निरनिराळ्या दिवाळी अंकांशिवाय, जसं की नवल, आवाज, अक्षर, किस्त्रीम, जत्रा आणि इतर असंख्य, दिवाळी ही दिवाळी वाटली नसती.

मराठीत असं वाचन केल्यानंतर माझा मोर्चा मी इंग्रजी भाषेकडे वळवला. या भाषेतील वाचन, प्रामुख्याने, जो काही पास होण्यापुरता अभ्यास केला त्यानिमित्ताने किंवा शिकवण्यासाठी शिकण्याच्या निमित्तानेच झाले होते. आजही या भाषेतील वाचन कादंबरी या साहित्य प्रकारापुरतेच मर्यादित आहे. पण Robin Cook च्या वैद्यकीय थरारकथा, John Grisham च्या कायदे कथा आणि Dan Brown च्या चमत्कृतीपूर्ण कथा यांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. Harry Potter (J. K. Rowling) आणि Lord of the Rings (J.R.R. Tolkien) हेही वाचनात डोकावत आहेत.

माझा इंग्रजी वाचनाचा प्रवास स्वयंप्रेरणेने चालू आहे. पण मराठी वाचन मात्र जवळ जवळ बंद पडले आहे. वयामुळे असेल कदाचित पण नवीन लेखकांशी म्हणावं तशी मैत्री जुळत नाही. कोणीतरी कुठलं तरी पुस्तक सुचवतं आणि मग मी ते वाचतो, यातूनच ‘नर्मदे हर’ सारखी अनवट पुस्तकं मिळून जातात आणि जाणीवेला नेणीवेच्या प्रांतात घेऊन जातात.

आता संकल्प आहे की ‘इंग्रजी अभिजात साहित्य वाचायचं’. पण विशीतला जोश आता कुठेतरी कमी झाला आहे आणि संसारी झाल्यामुळे मिळणाऱ्या वेळामधे खूपच घट झाली आहे. पण लवकरच आयुष्यातल्या बऱ्याचश्या गरजा भागतील आणि मी पुन्हा एकदा पुस्तकं खायला लागेन याची मला अगदी नक्की खात्री आहे! तोपर्यंत शांतता!

(कविता आणि लेख हे दोन महत्वाचे वाङ्ग्मयप्रकार या भागात अस्पर्श राहिले आहेत, याचा अर्थ असा नाही कि ते माझ्या वाचनात आलेच नाहीत पण त्यांच्याविषयी पुढच्या भागात!)

This entry was posted in Uncategorized and tagged , , , , , , , , , , . Bookmark the permalink.

2 Responses to मी, एक वाचक – भाग १

  1. सागर भंडारे says:

    केदार भाऊ भारी आहे. पुढचा भाग कधी?

  2. Pingback: मी, एक वाचक – भाग १ | Sonerisagar's Blog

Leave a comment